पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाच्या माध्यमातून भवरलालजी जैन यांनी जग बदलण्याचे कार्य केले – डॉ. पार्थ घोष
भाऊंच्या कट्ट्यामध्ये जळगाकरांशी संवाद
जळगाव I प्रतिनिधी परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाचे केलेले कार्य पाहून मी थक्क झालो.’ असे गौरोद्गार आंतरराष्ट्रीय पातळीवरील नीति सल्लागार, रणनीतिकार, मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी काढले. गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमांतर्गत कस्तुरबा सभागृह जैन हिल्स येथे कार्यक्रम आयोजला होता. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन हे व्यासपीठावर तर शहरातील गणमान्य श्रोते समोर उपस्थित होते.
श्रद्धेय मोठ्याभाऊंनी जैन हिल्स येथील इको सिस्टिम्स् चे कार्य उभारत असताना हॅण्ड, हार्ट आणि हेड या ३ ‘एच’ चा चपखल उपयोग करून घेतलेला दिसत आहे. प्रेरणा, स्थिरीकरण, सक्रियीकरण, अंतर्ज्ञान, संश्लेषण, नाविण्यपूर्ण वेगळेपण आणि शिक्षण या सात गोष्टींची जोड देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे हे प्रकर्षाने जाणवते. शेती हे क्षेत्र औद्योगिक व आर्थिक उन्नतीचे हृदय आहे. यावर जैन इरिगेशनच्या माध्यमातून भवरलाल जैन यांनी मोठे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवून आणले. असे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी व्यक्त केले.
‘why is a philosophical base key to creating sustainable enterprise’ या विषयावर शहरातील निमंत्रीत व्यक्तींसाठी ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमात जागतिक किर्तीचे व्यक्तीमत्त्व डॉ. पार्थ घोष यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आरंभी दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. आरंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुब्रम्हण्यम यांनी तर आभार प्रदर्शन अतुल जैन यांनी केले.
डॉ. पार्थ घोष यांनी समाजातील अलीकडच्या परिस्थितीवर भाष्य केले. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातील फरकांना बाजूला ठेवून, सर्व समावेशी विकासाचे मॉडेल विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी जपानच्या काही गावांचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की, तिथे लोक पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणि सामाजिक एकत्रितपणाने काम करतात, ज्यामुळे त्या गावांना शाश्वततेची भावना वाढीला लागते याबाबत सोदाहरण स्पष्ट केले.
भवरलाल जैन यांची दूरदृष्टी प्रेरणादायी
डॉ. पार्थ घोष यांनी श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टी संदर्भात विवेचन केले.पर्यावरणपूरक उद्योगाची निर्मिती करून सर्वसमावेश स्थिरता आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये प्रेरणा, स्थिरता, क्रियाशीलता, उभारणी, संश्लेषण, शिक्षण याचा समावेश दिसतो. तो चिरंतर आहे. त्यासाठी त्यांनी खालील मुद्दांवर विवेचन केले.
प्रेरणादायी : प्रेरणादायी दूरदृष्टी ठेऊन जी कर्मचारी आणि स्टेकहोल्डर्सना एकत्र आणते.
स्थिरता : सकारात्मक दृष्टी आणि मूल्ये हे कठीण वेळेतसुद्धा स्थिरता प्रदान करतात.
क्रियाशील : निरंतर क्रियाशील राहिले पाहिजे. ती नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
उभारणी : नवीन कल्पनांची उभारणी केली आणि सहकाऱ्यांकडूनही करुन घेतली.
संश्लेषण : विविध घटकांना एकत्र आणून एक सुसंगत अशी कार्यसंस्कृती विकसीत केली.
शिक्षक : शिक्षक म्हणून काम करणे म्हणजे काय तर निरंतर शिकण्याची आणि सुधारण्याची संस्कृती निर्माण करणे हे येथील वातावरणात दिसते. कृषि क्षेत्राला संशोधनात्मक दृष्ट्या कायम प्रगत करत राहण्याचा संस्कार भवरलाल जैन यांनी दिला.
शैक्षणिक क्षेत्रातील बदलांची गरज
डॉ. पार्थ घोष यांनी शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदलांची आवश्यकता अधोरेखित केली. आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याबाबत त्यांनी सांगितले. याच जोडीला महाविद्यालयीन स्तरावर शाश्वत विकासासाठी उद्योजकीय शिक्षणाचा समावेश करण्यात यावा आणि जागतिक बदल घडविणारी पर्यावरण पद्धती (इको सिस्टिम) उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच सामाजिक मूल्य आणि शाश्वतेला प्राधान्य देऊन नैतिकेतून विकास साधता येऊ शकतो याबाबत देखील त्यांनी प्रकाश झोत टाकला. उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.