भडगाव | प्रतिनिधी
कोरोनामुळे दीड वर्षात गावकऱ्यांशी त्या प्रमाणात संवाद नव्हता. त्यामुळे ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला. तालुक्यातील सर्व गावांचा दौरा करून लोकांच्या समस्या समजून घेत ज्या शक्य होत्या त्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न केला. तर उर्वरीत समस्या आगामी काळात सोडवण्यावर आपला भर राहील, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी रविवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या महिनाभरात संपूर्ण तालुक्यात पोहाेचलो. लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. समस्यांचे वर्गीकरण करून त्या-त्या विभागाकडे पाठवण्यात येतील. शेत रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे एक लाखाऐवजी तीन लाखांचा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. भडगाव तालुक्यात खालावलेली जलपातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाची कामांचे नियोजन आहे. दिव्यांगांना विविध साहित्यासाठी दहा लाखांचा निधी देणार आहे. लोकांच्या कामाच्या अनेक अपेक्षा असल्याचे त्यांच्या निवेदनांद्वारे समजले. त्या समस्या या तीन वर्षांच्या कार्यकाळात शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
प्रभागनिहाय दौरे करणार
ग्रामीण भागाप्रमाणे शहरात ‘आमदार आपल्या प्रभागात’ हा उपक्रम हाती घेण्यात येऊन समस्या सोडवण्यावर भर असेल. दुसरा टप्पा पाचोरा तालुक्यात सुरू करण्यात येईल. त्यानंतर भडगाव व पाचोरा शहरांचा दौरा करू असे ते म्हणाले. यावेळी सभापती डॉ.अर्चना पाटील, संजय पाटील, पं.स. सदस्य रामकृष्ण पाटील, बीडीअाे आर.एम.वाघ, कृउबा प्रशासक युवराज पाटील, डाॅ.प्रमोद पाटील, डाॅ.विशाल पाटील, प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील,भय्या पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे.के.पाटील उपस्थित होते.