सातारा : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओत एका महिला वनरक्षकाला दोघेजण मारहाण करत असताना दिसत आहेत.
व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातारा तालुक्यात सिंधू सानप आणि त्यांचे पती हे सातारा तालुक्यात वनरक्षक म्हणून काम पाहतात. काल त्या सातारा तालुक्यातील पळसावडे गावातील वनहद्दीत गेले असता त्या गावातील माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण केली.
या मारहाणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी सिंधू सानप यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर या पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनरक्षक महिला ही तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे. यामुळं लोकांकडून जास्तच संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत वनरक्षक सिंधू सानप यांनी म्हटलं की, त्यांनी वारंवार पैशांची मागणी केली होती. मला धमकी द्यायचे. मी त्यांना शासकीय कामातील पैसे खाऊन देत नव्हते. आमची ट्रान्जेस्ट लाईन सुरु होती. मला त्यांनी दोन दिवसांपूर्वी धमकी दिली. मी परत येत असताना मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या पतीला देखील चप्पलने मारहाण केली असल्याचं सिंधू सानप यांनी सांगितलं आहे.
सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे देखील वनरक्षक आहेत. त्यांनी सांगितलं की, सानप यांना धमक्या मिळाल्यामुळं मला आमच्या वरिष्ठांनी त्यांच्यासोबत जाण्यास सांगितलं. आम्ही गस्तीवर असताना मला प्रतिभा जानकर यांनी मला चप्पलनं मारहाण केली. यावेळी सानप मला सोडवण्यासाठी मध्यस्ती करत असताना जानकर पती पत्नींनी मला सोडून सानप यांना मारहाण केली असं ठोंबरे यांनी सांगितलं आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.