युवकांनो, स्वतःचे नेतृत्वगुण जोपासायला शिका : महापौर जयश्री महाजन

नेहरू युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय पडोस युवा संसदमध्ये मान्यवरांनी केले मार्गदर्शन

जळगाव । प्रतिनिधी

आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आपल्याला लढायचं असेल, जिंकायचं असेल तर त्यासाठी नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे. आपल्यात नेतृत्वगुण आहेत म्हणून तुम्ही याठिकाणी येऊन पोहचले आहेत. आपल्याला याच ठिकाणी थांबायचं नाही तर खूप पुढे जायचं आहे. आपण कुठे मागे पडतो आहे याचे परीक्षण आणि निरीक्षण करून आत्मचिंतन करा. त्यावर अभ्यास केल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. आपल्यातील नेतृत्वगुण जोपासायला शिका. तुमचा आयुष्य उज्ज्वल आहे त्यामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. देश विकसनशीलपासून विकसित होईल, असा विश्वास महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त्त केला.

 

छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात शुक्रवारी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन होत्या. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे, आकाशवाणीचे विजय भुयर, आयएमएचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, प्रेरणादायी वक्ते मनोज गोविंदवार, भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विनोद ढगे,  जेष्ठ नाट्यकर्मी नेहरू युवा केंद्राचे माजी स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, पत्रकार चेतन वाणी, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी रणजीत राजपूत, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा.लोकेश तायडे, प्रा.पौर्णिमा देशमुख आदी उपस्थित होते. यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे आयटीआयचे दीपक कोळी, संदीप उगले, प्रा.अशफाक, नूतन मराठाचे पी.बी.पाटील, मू.जे.महाविद्यालयाचे प्रा.देशमुख आदी उपस्थित होते.

 

शहीद भगतसिंग, सुकदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी जिल्हास्तरीय युवा संसद म्हणजे काय? त्याच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

 

अध्यक्षीय भाषणात महापौर जयश्री महाजन म्हणाल्या कि, राजकारणात अनेक दिग्गज राजकारणी असतात परंतु ते बोलू शकत नाही. त्यांना बोलता येत नाही म्हणजे ते अभ्यासू नाही का? तसे नाही ते अभ्यास करूनच याठिकाणी पोहचले असतात परंतु त्यांनी स्वतःतील बोलण्याचा गुण विकसित केलेला नसतो. त्यांनी त्यासाठी ते प्रयत्न देखील केलेले नसतात म्हणून ते मागे पडतात. हजारो लोकांसमोर उभे राहून बोलण्यासाठी मोठी हिम्मत लागते. नेहरू युवा केंद्र तुम्हाला विविध उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते त्याचा लाभ घ्या, असे त्यांनी सांगितले.

 

जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तुकाराम हुलावळे यांनी पीपीटी प्रेझेंटेशन देत निवडणूक आयोगाची कार्ये, कायदे समजावून सांगितले. भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणुकी पार पाडल्या जातात. निवडणूक पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहिता ठरवून दिलेली असते. समाजातील प्रत्येक घटकाला मतदान करता यावे यासाठी योग्य ती व्यवस्था ठेवण्यात येते. देशात युवा हा सर्वात मोठा मतदार आहे. युवकांची संख्या अधिक असली तरी मतदान करताना त्यांचे प्रमाण कमी दिसून येते. युवकांनी जागरूक होऊन मतदान करावे, योग्य लोकप्रतिनिधी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

डॉ.राधेश्याम चौधरी यांनी, भारतातील ६५ टक्क्यांपेक्षा अधिकची लोकसंख्या हि वयाच्या ४० पेक्षा कमी वयाची आहे. युवकांची वाढलेली हि लोकसंख्या शाप नसून वरदान ठरला आहे. युवकांनी अनेक क्षेत्रात भारताचे नावलौकिक निर्माण केले आहे. युवकांच्या जबाबदारी आणि कर्तव्यावर बोलणे आज आवश्यक आहे. विधायक मार्गाने युवाशक्ती गेल्यास ती प्रेरक आणि पूरक ठरू शकते. पण तीच शक्ती चुकीच्या मार्गाने गेल्यास ती मारक देखील ठरू शकते. वाट चुकणाऱ्या युवकांनी स्वतःकडे लक्ष ठेवत राष्ट्रनिर्माण करणारे व्हायला हवे. राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण स्वतःच स्वतःसाठी नैतिकतेची चौकट आखणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

जिल्हास्तरीय युवा संसदचे सूत्रसंचालन शुभांगी फासे, नेहा पवार यांनी केले तर तेजस पाटील, आनंदा वाघोदे, पल्लवी तायडे, मुस्कान फेगडे, शंकर पगारे, कल्पना पाटील, हेतल पाटील, चांदणी कोळी, मनोज पाटील, सुश्मिता भालेराव, मुकेश भालेराव, उमेश पाटील, रोहन अवचारे, दुर्गेश आंबेकर, निकिता मेढे, हिरालाल पाटील, संदेश पाटील, राहुल जाधव, रवींद्र बोरसे, गौरव पगारे, शाहरुख शेख यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment