अभ्यासकांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : स्टेट सायकॉलॉजिकल असोसिएशनतर्फे दि. १२ ऑगस्ट रोजी युवा मानसशास्त्रावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “युवकांचे मनःस्वास्थ्य, एक नवे आव्हान आणि समुपदेशनातील सकारात्मकता” हे विषय परिषदेसाठी ठेवण्यात आले आहेत. आयोजन जलाराम बाप्पा मंदिर सभागृह, चेतना व्यसनमुक्ती केंद्रासमोर, पोदार शाळेजवळ, जळगांव येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामनात मानसशास्त्र रुजवावयाचे काम स्टेट सायकॉलॉजिकल असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. मानस तज्ञांना प्रशिक्षण, संवाद कौशल्य शिकवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिषद आयोजित आहे. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री अॅड. उज्वल निकम व प्रमुख अतिथी म्हणुन मुंबई येथील सुप्रसिध्द मानसोपचार तज्ञ तथा राज्याचे मानसिक स्वास्थ विभाग प्रमुख डॉ.संजय कुमावत उपस्थित राहणार आहे.
या परिषदेत “युवकांचे मनःस्वास्थ्य, एक नवे आव्हान आणि समुपदेशनातील सकारात्मकता” या विषयावर परिसंवाद व विचार मंथन होणार आहे. त्याचबरोबर अँड. उज्वल निकम व डॉ. संजय कुमावत यांचे मार्गदर्शन सुध्दा होणार आहे. परिषदेमध्ये रोहिणीताई आचवल स्मृती पुरस्कार मानस तज्ञ डॉ. सोपान बोराटे यांना देण्यात येणार आहे. परिषदेत महाराष्ट्र राज्यातील मानसशास्त्र विषयाचे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे. नव्यानेच जगात उदयाला येणाऱ्या या सकारात्मक मानसशास्त्राच्या नव्या उपक्रमाचा लाभ अभ्यासकांनी घ्यावा असे आवाहन सायकॉलॉजिकल स्टेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदिप सिसोदे, सचिव डॉ. अजित पाटील, डॉ. विशाल गनार, कालिदास पाटील,अलकाताई काकडे , संदीप शिंदे ,सचिन सारोळकर ,नीता जैन ,डॉ शरद गोरडे ,भावना पुरोहित , प्रशांत मेश्राम ,किशोर आघम , परिषदेचे समन्वयक नितीन विसपुते यांनी केले आहे.