स्वत:चे एक घर असावे असे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. तसेच जेव्हा घर तयार होते, त्याला घरमालक एक विशेष नावही देतो. ग्रामीणभागात घराला नाव देताना आपल्या आईवडिलांच्या, मुलांच्या किंवा देवांच्या नावावर घराचे नाव दिले जाते.
असे असतानाच साताऱ्यातील एका शेतकऱ्याचे घर त्याच्या नावामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या घराला ८६०३२ ची कृपा असे नाव दिले आहे.
हे नाव ऐकून सगळेच हैराण झाले आहे. कारण याचा अर्थ अनेकांना माहित नाही. पण ८६०३२ हे एका उसाच्या जातीचे नाव आहे. तसेच याबाबतची माहिती जेव्हा या उसाची जात शोधणाऱ्या संशोधकांना म्हणजेच राहूरी विद्यापीठातील संशोधकांना मिळाली, तेव्हा त्यांनी शेतकऱ्याची भेट घेतली आहे.
खटाव तालुक्याच्या चोराडी गावात राहणाऱ्या बापू आण्णा पिसाळ या शेतकऱ्याने आपल्या घराला ८६०३२ ची कृपा असे नाव दिले आहे. तसेच बंगल्याची रंग देताना या उसाचे चित्रही रेखाटले आहे.
या उसाची लागवड केल्यामुळे उत्पन्न वाढलं, चांगले पैसे मिळाले आणि त्यातुनच हा बंगला बनवता आला. त्यामुळे हे नाव मी माझ्या घराला दिले आहे, असे बापू अण्णा पिसाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या बंगल्याचे नाव सगळीकडेच चर्चेचा विषय बनला.
या बंगल्याची माहिती राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मिळाली, तेव्हा त्यांनीही शेतकऱ्याची दखल घेतली आहे. राहूरी कृषीविद्यापीठातील संशोधकांनी पिसाळ यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला आहे.
राहूरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधकांनी १९९६ रोजी उसाची ८६०३२ ही जात शोधली होती. तेव्हापासून राज्याच्या तिन्ही हंगामास या जातीच्या उसाची शिफारस करण्यात आली होती. चांगले उत्पन्न देणारी उसाची जात अशी ओळख या उसाची आहे. या उसाच्या जातील २५ वर्षे पुर्ण झाली आहे.
पिसाळ त्यांच्या शेतात याच उसाची लागवड करतात. त्यामुळेच त्यांची आर्थिकस्थिती बदलली आणि त्यांनी एक बंगला बांधला आहे. त्यामुळे उसाच्या या जातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी आपल्या बंगल्याला हे नाव ८६०३२ ची कृपा असे नाव दिले आहे.