जळगाव प्रतिनिधी: जळगावातील सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. आज शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम २९० रुपयाने तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळपास ८००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने ५६२०० रुपये प्रति १० ग्रॅमचा रेकॉर्ड पार केला होता.
सध्या कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीवर दबाव कायम आहे. त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण सुरु आहे. जळगाव सराफ बाजारात जून महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झाली होती.
सोने पुन्हा एकदा प्रति दहा ग्रॅम ४९ हजार रुपयांच्या खाली आले आहे. तर चांदी ७० हजार रुपये प्रति किलोच्या खाली आले आहे.
जळगावातील सराफ बाजारात जून महिन्यात सोने दरात जवळपास २००० हजाराची घसरण झाली होती. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, आगामी पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात सोन्याची वाटचाल कशी राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.