मुंबई:
- बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेता हनीसिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हनीसिंग पुन्हा अडचणीत सापडला आहे. शालिनीने हनीसिंगविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टाचे दार ठोठावले आहेत. हनीसिंगविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे.
- शालिनी तलवार हिचे वकील संदीप कपूर, अपूर्वा पांडे आणि जीजी कश्यर यांनी आज तीस हजारी कोर्टाच्या तानिया सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर केली. या याचिकेनंतर कोर्टाने हनीसिंगविरोधात एक नोटीस जारी केली. या नोटीसमध्ये २८ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश हनीसिंगला देण्यात आले आहेत. तसेच दोघांच्या नावे असणारी संपत्ती आणि शालिनीच्या स्त्रीधन विकण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. शालिनी तलवारच्या बाजूने ही ऑर्डर पास करण्यात आली आहे.
- शालिनी तलवारने पती हनीसिंगविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. हनीसिंगसह त्याचे आई-वडील आणि बहिणीविरोधात शालिनीने शारीरिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, मानसिक छळ, आर्थिक हिंसाचार असे गंभीर आरोप दाखल केले आहेत. शालिनीने कोर्टात सांगितले की, हनीसिंगने तिचे स्त्रीधन तिच्याकडे द्यावे तसेच दोघांच्या नावे असणाऱ्या संपत्तीच्या विक्रीवर बंदी आणावी.
- हनीसिंग आणि शालिनी तलवार यांच्यात २० वर्षे मैत्रीचे संबंध होते. या मैत्रीचे कालांतराने प्रेमात रुपांतर झाले. यानंतर २०११ मध्ये दोघांनी शीख पद्धतीने दिल्लीच्या फॉर्महाउसवर विवाह केला. मात्र त्यांच्या लग्नबद्दल खूप कमी लोकांना माहित होते. काही दिवसांपूर्वी हनी सिंगचे नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडले जात होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे हनी सिंगने स्पष्ट केले.