महाकुंभमेळ्यासाठी १३ हजार रेल्वेगाड्या धावणार

नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यासाठी नियमीत आणि विशेष मिळून १३ हजार रेल्वेगाड्या धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच रेल्वेकडून यावेळेस विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच रेल्वेकडून गाड्यांच्या दोन्ही बाजूला इंजिन बसवण्यात येणार आहेत. जेणेकरून इंजिनची बाजू बदलण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि अधिकाधिक गाड्या चालवता येतील. यांपैकी ३ हजार रेल्वेगाड्या विशेष असतील, असे वैष्णव यांनी सांगितले.

महाकुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा देखील रेल्वेमंत्र्यांनी घेतला आहे. वैष्णव यांनी सांगितले की, यावेळी महाकुंभाची व्यापक तयारी सुरू आहे. महाकुंभाशी संबंधित विकासकामांवर रेल्वेने ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून रेल्वेकडून महाकुंभाची तयारी सुरू आहे. २०१९ मध्ये झालेल्या कुंभ दरम्यान ७ हजार गाड्या चालवण्यात आल्या होत्या. यावेळी ही संख्या जवळपास दुप्पट आहे. या कालावधीत रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. या कालावधीत १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

महाकुंभ दरम्यान १६ डब्यांच्या मेमू गाड्याही प्रथमच धावणार आहेत. मेमू गाड्यांना दोन्ही बाजूला इंजिन आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी मोठ्या संख्येने भाविक महाकुंभासाठी येणार आहेत. राज्य सरकारबरोबरच रेल्वेनेही सविस्तर तयारी केली आहे. राज्य सरकारच्या समन्वयाने रेल्वे आपले काम करत आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment