जळगाव : उद्योग-व्यवसायाला चालना मिळावी यासाठी 26 प्रकल्पांशी सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून तब्बल बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.
श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढावा यासाठी अन्य उद्योजकांच्या माध्यमातून उद्योगांची उभारणी करण्यात येत आहे. स्थानिक उद्योजकांसह अन्य 26 उद्योजकांनी पुढाकार घेवून बाराशे कोटी रुपयांची गुतंवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी हे उद्योग मदत करणार आहेत. जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांनी यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यावर भर दिला जात असून एमआयडीसीतील उद्योजकांसाठी दळणवळण, वीज, पाणी यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुण बाहेर जात असल्याने त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायावर होत असल्याने सरकारच्या माध्यमातूनही स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करुन दिला जात आहे. शेती व्यवसायाला देखील चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारले जात आहेत. केळी, कापूस, लिंबू या पिकांवर प्रक्रिया करुन त्याला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आठ लाख कामगारांचे इएसआयसीचे कार्ड तयार करण्यात आले असून त्यांना कुठल्याही स्वरुपाच्या आरोग्य सुविधांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येत आहे. कामगारांच्या समस्या सोडविण्यावर देखील भर दिला जात आहे. कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचाही त्यांना लाभ दिला जात आहे.
26 उद्योजकांच्या पुढाकारातून आकारस येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून तीन हजारांवर तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे सामंजस्य करार करण्यात आले असून त्याला लवकरच मूर्त स्वरुप प्राप्त होणार आहे.