जळगाव: रविवारी रात्री उशिरा, जळगाव एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत तयार माल आणि कच्च्या मालाचा मोठा साठा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जिल्ह्यातून मागवले बंब
रात्री 11.15 वाजता लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव, भुसावळ, वरणगाव, दीपनगर, आणि चाळीसगाव येथून आठ ते दहा अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले.
कामगार सुखरूप बाहेर
रविवारी रात्री तिसऱ्या शिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या 10-15 कामगारांनी आग लागल्यावर तातडीने कारखान्याबाहेर धाव घेतली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली. आगीत कंपनीच्या कुलरमधील शॉर्ट सर्किटला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.