चाळीसगाव : गणेशोत्सव निमित्ताने चाळीसगाव शहरासह तालुकावासीयांना १० दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतील चाळीसगावचा एकदंत या भव्य सांस्कृतिक महोत्सवामध्ये नृत्य, गायन, कीर्तन, अध्यात्म, प्रबोधन, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आबालवृद्धांसह विशेषतः महिला भाविकांनी या महोत्सवाला भेट दिली. आपला दररोजचा संसार – प्रपंच सांभाळून स्वतःसाठी वेळ काढणाऱ्या या महिला भाविकांसाठी जवळपास १०० बक्षिसांचा लकी ड्रॉ आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास १० हजार महिलांनी आपली नोंदणी केली होती.
आज महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. त्यात सर्वात मोठे व पहिल्या क्रमांकाचे बक्षीस असणारी इलेक्ट्रिक स्कूटर या बक्षिसाच्या मानकरी चाळीसगाव शहरात अफू गल्ली मध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय मथुराबाई जगन्नाथ गायके या ठरल्या. विशेष म्हणजे मथुराबाई यांच्या अगोदर दोन महिलांच्या नावाची चिट्ठी काढण्यात आली मात्र त्या लकी ड्रॉ साठी उपस्थित नसल्याने नियमाप्रमाणे पुढील चिठ्ठी काढली असता त्यात मथुराबाई यांचे नाव निघाले, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लकी ड्रॉ चा खेळ सुरु होता. अत्यंत गरिबीची परिस्थती असणाऱ्या मथुराबाई गायके यांच्या पायात चप्पल देखील त्यावेळी नव्हती. भाजीपाला विक्री करून त्या आपला उदरनिर्वाह चालवितात, त्यांचा एक नातू एका खाजगी फर्म तर एक नातू नंदन डेअरी वर कामाला आहेत. खऱ्या अर्थाने त्या कष्टकरी आजीला गणपती पावला अशीच भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
आमदार मंगेशदादा चव्हाण, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याहस्ते मथुराबाई गायके यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात आली. ७० वर्ष वय असले तरी तरुणांना लाजवेल असा उत्साह मथुरा आजी यांचा होता. माझी तब्बेत अजूनही चांगली आहे, मला या गाडीचा उपयोग नाही, आयुष्यभर मी पायी चालून कष्ट घेत संसार केला तस यापुढेही मी पायीच चालेल… गाडीची चार्जिंग संपेल पण माझ्या पायांची नाही असे आजीनी म्हणताच उपस्थितांनी जोरात टाळ्या वाजवत आजीला दाद दिली.