जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार झाली असून, त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मंगळवारी संदीप पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना, स्थानिक गुन्हेगारीला आळा घालण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संदीप पाटील यांच्याकडे प्रशासकीय आणि तपासाचे सखोल ज्ञान असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.