नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भाजपने चंडीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एकूण 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा भाजपने केलेली नाही. विशेष म्हणजे 9 जागांपैकी 7 जागांवर उमेदवार बदलले असून, किरण खेर आणि रिता बहुगुणा यांच्यासह 5 खासदारांचे तिकिट मात्र पक्षाने कापले आहे.
चंडीगडमध्ये विद्यमान खासदार किरण खेर यांच्याऐवजी संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी येथून जयराज सिंह ठाकूर, कौशाम्बी येथून विनोद सोनकर, फूलपूर येथून प्रवीण पटेल, अलाहाबाद (प्रयागराज) येथून नीरज त्रिपाठी, बलिया येथून नीरज शेखर, मछलीशहर येथून बी.पी. सरोज आणि गाझीपूर येथून पारसनाथ राय यांना ऊमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे.
भाजपाने आसनसोल येथून एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना तृणमूल काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी होणार आहे. भाजपने आतापर्यंत 425 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने सर्वप्रथम 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. 80 जागा असलेल्या यूपीमध्ये भाजप 74 जागांवर निवडणूक लढवत आहे. 6 जागांपैकी मित्रपक्ष आरएलडी 2 जागांवर, अनुप्रिया पटेल यांचा स्वपक्ष 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.