भुसावळ | शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी भुसावळमधील खाजगी क्लासेससाठी दररोज प्रवास करते. दरम्यान, दर्शन अनंत चिंचोले (वय २१, रा. भुसावळ) या तरुणाने गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग केला. तो तिला जबरदस्तीने प्रेमसंबंध आणि लग्नासाठी भाग पाडत होता.
९ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता, आरोपीने तरुणीचा हात पकडत तिला आत्महत्येची धमकी दिली आणि मानसिक त्रास दिला. घाबरलेल्या तरुणीने लगेचच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तिच्या तक्रारीवरून दर्शन चिंचोले याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहेत.