पावसाळ्याचे वातावरण हे अनेक प्रकारच्या जंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळेच ह्या वातावरणात अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी पसरतात. त्यापैकीच एक डोळ्यांचा साथीचा रोग जो ह्या वातावरणात पसरतो आहे तो आहे ‘कंजंक्टीवायटिस’.
ह्या साथीच्या रोगाचे कारण व निदान काय?
डोळे येण्याची साथ ही मुख्यत्वे एक प्रकारच्या वायरसमुळे असते.
हा आजार कसा पसरतो?
हा आजार मुख्यत्वे वायरसच्या थेट संपर्कात आल्याने होतो. उदा. डोळे आलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा रूमालावर हा वायरस असू शकतो. ह्या व्यक्तीच्या हाताचा स्पर्श तुमच्या हातास झाला आणि तो हात तुम्ही डोळ्यांना लावला तर तुम्हाला ह्या रोगाची लागण होऊ शकते.
अशा प्रकारे प्रादुर्भाव झालेले पृष्ठभाग उदा. दारांचे हँडल्स, रूमाल, टाॅवेल, काॅम्प्युटरचे माऊस, इत्यादी ह्यांच्या स्पर्शाद्वारे हा आजार पसरतो. शिवाय आजार झालेल्या व्यक्तिच्या शिंकेतून किंवा खोकल्यातूनही हा आजार पसरू शकतो.
गैरसमज –
असे मानले जाते की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात, हा गैरसमज आहे. निव्वळ बघितल्याने आजार पसरत नाही.
लक्षणे –
(१) डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे.
(२) डोळे लाल, गुलाबी होणे.
(३) डोळ्यांना खाज, जळजळ होणे.
(४) सकाळी झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिकटून बसणे.
(५) पापण्यांना सूज येणे, इत्यादी.
आजार झाल्यानंतर घ्यावयाची काळजी –
(१) लक्षणे दिसतच शाळेत किंवा कामावर जाणे बंद करावे.
(२) स्वतःच्या वस्तू उदा. टाॅवेल, रूमाल, उशी, इ. दुसऱ्यास वापरायला देऊ नये.
(३) घरच्या व्यक्तींच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
(४) सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे.
(५) वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे.
(६) डोळ्यांना आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे.
(७) प्रोटेक्टीव गाॅगल लावावा.
(८) स्वतःहून काही उपचार न करता डाॅक्टरांच्या सल्यानुसारच आैषधोपचार सुरू करावा.
कंजक्टीवायरिसमुळे डोळ्यात इतर कोणत्या गुंतागुंती (Complications) न झाल्यास हा आजार ५ ते ७ दिवसांत ठिक होतो.
डॉ. अमोल कडू
विभाग प्रमुख, क्लिनीकल सर्व्हिसेस,
कांताई नेत्रालय, जळगाव