मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल

मुंबई –  पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

 

महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. मोचा चक्रीवादळामुळे हवामानात बदल होणार आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागर आणि अंदमान समुद्रात 8 मे ला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 9 मे पर्यंत ते अजून तीव्र होण्याचा अंदाज देखील त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. 8 ते 12 मे  दरम्यान समुद्र खवळलेला राहील. त्यामुळे मच्छीमारांना आणि पर्यटकांना समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळ आणि पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजधानी दिल्लीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Maharashtra Weather UpdatesRainRain Alert Maharashtrarain comeback
Comments (0)
Add Comment