अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ रोजी अमळनेरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या सफाई कामगारांसोबत ते भोजन ही घेणार आहेत.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकार या ही उपस्थिती देणार आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या यात्रेची जय्यत तयारी केली असून अजित पवारांच्या स्वागताचे फलक संपूर्ण शहरासह तालुक्यात झळकले आहेत. या जनसन्मान यात्रेचे दुपारी १ वाजता धुळ्याकडून अमळनेरात आगमन होणार आहे. कलागुरु मंगल कार्यालयाजवळील प्रवेशद्वारापासून भव्य बाईक रॅलीने त्यांचे शहरात स्वागत केले जाणार आहे. दुपारी १.३० वाजता माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या राज भवन येथील निवासस्थानी स्वागत व चहापाणीसाठी ते जातील. त्यानंतर २ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन तेथून सुभाष चौकातील सुभाष बाबूजींच्या पुतळ्यास व अर्बन बँकेसमोर साने गुरुजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी अर्धातास इंदिरा भवन येथे सफाई कामगारांसोबत भोजनासाठी त्यांचा वेळ राखीव असणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ स्वागत व शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दुपारी ३.१० वाजता प्रताप महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्यात त्यांचे आगमन होणार आहे. हा संवाद मेळावा आटोपून दुपारी ४.३० वाजता धुळे रोडवरील कलागुरु मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी सन्मान संवाद मेळाव्यात त्यांचे आगमन होईल. या मेळाव्यांनंतर सायंकाळी ६.३० वाजता प्रताप मिलमधील बन्सीलाल पॅलेसमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकीत ते १ तास संवाद साधणार आहे. रात्री वाजेनंतर विनोद कदम यांच्या निवासस्थानी भोजनासाठी त्यांचा वेळ राखीव आहे. युवा संवाद व शेतकरी सन्मान संवाद कार्यक्रमात विद्यार्थी, युवा व शेतकऱ्यांनी आवश्य उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंत्री अनिल पाटील व राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे