जळगाव | प्रतिनिधी
अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून डॉ. इंद्राणी मिश्रा असतील. सोबत जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतूल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन उपस्थितीत असतील. ९, १०, ११ फेब्रुवारी असे तीन दिवस खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४.३० ते ८.३० वाजेदरम्यान मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा संस्कृतीचे ऐतिहासिक दर्शन हे एड्युफेअरचे आकर्षण असेल.
‘खेळता खेळता शिका व शिकता शिकता खेळा’ ह्या संकल्पनेवर आधारित एड्युफेअरमध्ये १४ झोन असून ८० पेक्षा जास्त खेळ अनुभवता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चार वयोगटानुसार खेळांची विभागणी केली आहे. यामध्ये भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या इंग्रजी, हिंदी, मराठी मध्ये अनेक खेळ आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वीतेवर विज्ञान झोन, नासा, रशियाच्या स्पेस कार्यावर अनेक वर्किंग मॉडेल असतील, यातून प्रत्यक्ष इस्रो मध्ये असल्याची अनुभूती होईल. गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती व सृजनशिलतेला चालना देणारे कोडींग मॉडेल उभारले आहे.
मनोरंजनात्मक एड्युफेअर..
मनोरंजनातून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकलेचा आविष्कार पाहता येणार आहे. यात पपेट शो, नृत्य, संगीत, तबला, लाठी-काठी नृत्य, बासरी, चार्ली चैपलिन यासह विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनविलेल्या हस्तकलेच्या २००० पेक्षा जास्त वस्तूंचे प्रदर्शन बघता येईल. अॅडव्हेंचर गेम झोनमध्ये जे पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे विटी दांडू, तीन प्रकारची मांडोळी, गोट्या, लाकडी व प्लास्टिक भवरा, लगोरी, पावसाळ्यातील चिखलात खेळला जाणारा खुपसनी या खेळासोबतच हॉकी, ड्रॉफ्ट द बॉल, बिन बॅग, जिम बॉ थ्रो रिंग टॉस असे शारीरिक व्यायामासोबतच आनंद देणारी खेळसुद्धा एड्युफेअर मध्ये खेळता येतील.
चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्ली…
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांनी व्यावसायाभिमूख शिक्षणप्रणालीवर आधारित शिक्षणव्यवस्था तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते, त्या कलागुणांना हेरून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या एड्यूफेअरचे आयोजन मोठ्याभाऊंच्या प्रेरणेतून करण्यात आले आहे. यात चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्लीत पालकांसोबत विद्यार्थ्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्वत:चे स्टॉल असतील यावर ताव मारण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध करून दिली आहे.
सिंधू संस्कृतीचे दर्शन..
एड्युफेअरचे मुख्य आकर्षण असलेले सिंधू संस्कृतीचे दर्शन होणार आहे. अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: सिंधू संस्कृतीची नगररचना केली. हडप्पा संस्कृतीची नगररचना आणि स्थापत्य, घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, धान्याची कोठारे आदी हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पनांचे २०० च्या वर मॉडेल विद्यार्थ्यांनी साकार केले आहे. आतापर्यंत फक्त पुस्तकामध्ये हडप्पा संस्कृती वाचली असेल मात्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सृजनशीलतेला चालना देणारे भन्नाट कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी एड्युफेअरमध्ये यावे, असे आवाहन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे. यातील काही निवडक खेळ सशुल्क असतील.