जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया व डिजिटलायजेशन वाढत जात आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारदेखील वाढून सायबर क्राईम वाढत जात आहे. सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी मुंबईतील डोंगरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक वेबसाईट तयार केली आहे.
www.cybersandy.com नावाची ही वेबसाईट असून, या वेबसाईटव्दारे सायबर गुन्ह्यांपासून कसा बचाव व्हावा यासाठीची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. अनेकदा केवळ काही कोड किंवा काही क्लिक दाबल्या गेल्यामुळे देखील काही मिनिटातच नागरिकांच्या बँकेतून मोठी रक्कम परस्पर वर्ग करून, मोठी फसवणूक केली जाते. ही फसवणूक होवू नये म्हणून संदीप पाटील यांनी आपल्या तपास कामातून मिळालेल्या अनुभवातून काही महत्त्वाच्या बाबी या वेबसाईटमधून मांडल्या आहेत. संदीप पाटील हे जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यातून बदली होऊन मुंबईला गेले आहेत.
डोंगरी पोलिस ठाण्यात सायबर ऑफिसर म्हणून ते काम करीत आहेत. सायबर गुन्ह्यांचा तपास पाटील यांच्याकडे असतो. याच विभागातून मिळालेले अनुभव, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पध्दती जाणून नागरिकांची फसवणूक होवू नये म्हणून यासाठीची माहिती दिली आहे.