जळगाव : घरकुल घोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. या आधीच जैन हे वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत.
१९९० साली जळगावात घरकुल योजनाघोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्या सह ४८ जणांना धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. यानंतर बहुतांश संशयितांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यातील काही अपवाद वगळता इतरांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
मात्र प्रमुख आरोपी सुरेशदादा जैन यांना दिलासा मिळालेला नव्हता. त्याविरोधात जैन यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रकृती अस्वस्थ्यामुळे जैन है वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्यानंतर जैन यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने जैन यांना नियमित जामीन मंजूर केला.
काय आहे घोटाळा
सुमारे २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार या ‘घरकुल’ योजनेत झाल्याच्या आरोपात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने ३१ ऑगस्ट रोजी सुरेश जैन यांच्यासह अन्य ४७ जणांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षा सुनावल्याच्या दिवशीच सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेशही दिले होते. त्याचबरोबर तब्बल १०० कोटी रुपयांचा दंडही न्यायालयाने सुनावला होता.
जैन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह इतर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. या घरकुल योजनेत सुमारे ५ हजार घरांची बांधणी होणार होती. मात्र अवघ्या १५०० घरांचीच उभारणी करण्यात आली. बांधकामव्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन आरोपींनी संगनमताने यामध्ये गैरप्रकार केला असा ठपका फिर्यादीमध्ये करण्यात आला होता. साल २००६ मध्ये तत्कालीन पालिका आयुक्तांनी याबाबत रितसर तक्रार केली होती. जैन यांना याप्रकरणी मार्च २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती.