पाचोरा : प्रतीनिधी
पाचोरा तालुक्यातील खाजोळा गावाजवळ असलेल्या सार्वे बुद्रुक येथे बुधवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान २७ वर्षाचा युवक गावाबाहेर शौचालयास गेलेला असतांना मक्याचे शेतात हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मोबाईल लोकेशन व्दारे रात्री दहा वाजता पोलीसांना मृतदेह आढळून आला. गेल्या आठ दिवसांपूर्वी गावातील काही नागरीकांना एका बछड्यासह बिबट्या आढळून आला होता. घटनास्थळी जाऊन वन विभागाने पंचनामा केला असून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे आर. एफ. ओ. ए. एस. मुलाणी यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे कि, सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील (वय – २७) हा दिनांक २९ रोजी सकाळी ८.३० वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता. दरम्यान सुजित याचे आई वडील सुजितच्या आजोबांची हतनूर तालुका कन्नड येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने तो इतकावेळ कुठे गेला , याची चौकशी सुरू झाली सुजितचा मोबाइल सोबत असलेल्या रिंग वाजत होती. मात्र मोबाईल कुठे वाजतो हे कळत नव्हते ? घरच्या मंडळींनी थेट नगरदेवळा दुरक्षेत्र गाठुन पोलिसांना माहिती दिली दरम्यान पोलिस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असतांना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृत देहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडे ही काही अंतरावर आढळून आले. सुजातच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा मोठमोठ्या जखमा आढळून आल्या. सुजित हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता त्याने मराठी, इंग्रजी टायपिंग, स्टेनो असे विविध कोर्स पूर्ण केले होते. तो पदवीधर असल्याने व ४० टक्के अपंग असल्याने नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. सुजित याचे पाच्छात आई वडील व एक बहीण असा परिवार असून त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. सुजित हा अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
वन विभागाने केला पंचनामा
वनविभागाचे आर. एफ. ओ. ए. एस. मुलाणी, वनपाल ए. बी. देवरे, वनरक्षक वाय. एच. साळुंखे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृत देहाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र घटनास्थळी बिबट्याचे पायाच्या खुणा त्यांना आढळून आलेल्या नाही.