“तुम्ही किती मर्सिडीज दिल्या?” उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंना सवाल

मुंबई : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत. “ठाकरेंना मर्सिडीज दिली की, मोठी पदं मिळतात,” असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंवर जोरदार हल्लाबोल केला. “जाऊ द्या… मी गयेगुजऱ्या लोकांवर बोलत नाही. महिला म्हणून त्यांचा आदर आहे. पण त्यांना आम्ही ४ वेळा आमदार केलं, त्यांनी किती वेळा मर्सिडीज दिल्या?” असा सवाल करत गोऱ्हेंवर टीका केली.

शिवसेनेत प्रवेश : रविवारी मातोश्रीवर अहिल्यानगर इथले काँग्रेसचे जिल्हाप्रमुख किरण काळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. काळे यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हे आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.

गद्दारांवर मी बोलणार नाही : “आजही निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. शिवसेनेतून गद्दारी करून गेलेल्यांवर मी बोलणार नाही. अनेक ठिकाणाहून आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी शिवसेनेला पत्र येत आहेत. उत्तर प्रदेशमधील शिवसैनिकांनीही पत्र पाठवली आहेत. तिकडेही संघटनात्मक बैठका सुरू आहेत. परंतु, जे शिवसेनेतून गद्दारी करून गेले. त्या गद्दारांवर मी बोलणार नाही. आगामी काळात शिवसेनेत अनेक प्रवेश होणार आहेत,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment