HSC RESULT : निकाल लांबणीवर पडल्याने लाखो विद्यार्थ्यांना फटका!

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकाल  जाहीर करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने केंद्रीय अभ्यासक्रमांसोबत इतर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला राज्यातील लाखो विद्यार्थी  मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्टीय स्तरावरील विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 23 जुलै रोजी सीएलएटी ही आणि 30 जुलै रोजी एआयएलईटी या परीक्षा पार पडल्या. या परीक्षांना महाराष्ट्रासह देशात लाखभर विद्यार्थी बसले होते. या परीक्षानंतर आता विधीच्या केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याठिकाणी बारावीची गुणपत्रिका, टीसी आणि सोबतच मायग्रेशन प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडून मागितले जात आहे. यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतील प्रवेश हे 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहेत. अन्यथा हे प्रवेश रद्द होण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

राज्यात अजूनही बारावीचा निकालच जाहीर झाला नसल्याने या राष्ट्रीय स्तरावरील विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून राज्यातील लाखो विद्यार्थी मुकण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने याविषयी सरकारने तातडीने राज्य शिक्षण मंडळासोबत महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना तातडीने सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्याची मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.

महाविद्यालय स्तरावर कर्मचारी उपलब्ध व्हावेत

मुंबईसह राज्यातील बहुसंख्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्र देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. कोरोनामुळे कर्मचारी नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. परिणामी अनेकदा पालकांना ताटकळत ठेवले जात आहे. बारावीच्या निकालापूर्वी बोनाफाईट, आणि मायग्रेशन आदी प्रमाणपत्र उपलब्ध होणे आवश्यक आहेत, त्यामुळे शिक्षण विभागाने प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात कर्मचारी उपस्थित राहण्यासाठी आदेश जारी करावेत अशी मागणीही पालक-विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment