अनैतिक संबंधामुळे पतीकडून चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव । प्रतिनिधी

दोन दिवसांपुर्वी प्रियकरासोबत घरात एकत्र सापडल्यानंतर पत्नीकडून पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने पतीने सविता जितेंद्र पाटील (वय-20) यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराजवळील ब्रम्हांडनायक अपार्टमेंटमध्ये घडली. खून केल्यानंतर संशयीत जितेंद्र संजय पाटील (रा. बांभोरी) हा स्वत:हून तालुका पोलिसात हजर झाला. त्यानेच पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली.

जळगाव तालुक्यातील बांभोरी येथे जितेंद्र पाटील हा वास्तव्यास असून त्याचे तीन वर्षांपुर्वी सविता यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून जितेंद्र हा कामधंदा करीत नसल्याने तो काही महिन्यांपासून बांभोरी येथे आपल्या गावी राहत होता. परंतु पत्नीच्या हट्टामुळे तो आठ दिवसांपुर्वी निमखेडी शिवारातील ब्रम्हांडनायक आपर्टमेंटमध्ये राहायला आला होता. दोन दिवसांपुर्वी जितेंद्रने सविताला आपल्या घरातच प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले होते. याबाबत वाच्यता केल्यास आणि कोणाला काही सांगितल्यास तुमचे नाव सांगून मी आत्महत्या करुन टाकेल अशी धमकी पतीला देत होती. याकारणावरुन दोघ पती पत्नीमध्ये वाद सुरु होते. संतापाच्याभरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्रने मोबाईल चार्जिंग करणार्‍या वायरच्या सहाय्याने पत्नी सविताचा गळा आवळून तीचा खून केला.

स्वत:हून झाला पोलीसांच्या स्वाधीन

पत्नीचा खून केल्यानंतर संशयित जितेंद्र पाटील हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपण पत्नीचा खून केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी तो भाड्याने राहत असलेल्या घरात सविता यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या पश्चात दीड वर्षाची मुलगी तन्वी, वडील, बहिण, सासू, सासरे असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

रात्री उशिरापर्यंत सुरु होते गुन्हा दाखल करण्याचे काम

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार, वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर कोळी, नरेंद्र पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment