जळगाव]: निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिविल सेर्विसेसचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभव स्वीकारला व स्पर्धेतील उपविजेतेपद पटकाविले.
जैन इरिगेशनच्या महिला संघानेही उत्कृष्ठ अशी कामगिरी करतांना साखळी फेरीत बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत मात्र पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या संघाविरूध्द १-२ ने निसटता पराभूत होऊन चतुर्थ क्रमांक पटकावला.
पुरुष एकेरी गटात जैन इरिगेशनच्या संदीप दिवेने अनेक नामवंत खेळाडूंचा पराभव करून ६वा क्रमांक प्राप्त केला. ह्या गटात पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या योगेश परदेशीने अंतिम सामन्यात त्याच्याच संघाच्या के. श्रीनिवासचा सरळ दोन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
पुरुष वयस्करगटाच्या राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने तेलंगाना आणि सिविल सेर्विसेसच्या खेळाडूंचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्य फेरीत कर्नाटकच्या के.ई. सुरेश कुमारचा व उपांत्यफेरीत तामिळनाडूच्या ई. महीमईराजचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या शांतीलाल जीतिया याचा २५-२० आणि १६-१३ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी अखिल भारतीय कैरम फेडेरेशनच्या महासचिव सौ.भारती नारायण, आंतरराष्ट्रीय कैरम महासंघाचे सचिव श्री. व्ही.डी.नारायण,तेलंगाना कैरम असो.चे सर्वश्री संतोषकुमार,नीरज संपथी, प्रविणकुमार जी, नव्याभारती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. इंदिरा संतोषकुमार व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जैन इरिगेशनच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, संचालक श्री.अतुल जैन आणि प्रशासकीय क्रीडाधिकारी श्री.अरविंद देशपांडे व सर्व सहकार्यांनी आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व कैरम व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.