शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर हाय होल्टेज ड्रामा
शरद पवारंची राजीनाम्याची घोषणा करताच सभागृहात एकच गडबड-गोंधळ सुरु झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना तिथेच अडवलं आणि प्रत्येक नेत्यांने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसंच सर्व नेत्यांनी शरद पवार आपण आपली घोषणा मागे घ्यावी अशी विनंती केली. यावेळी जयंत पाटील भाषणात असंही म्हणाले की, ‘हा पक्ष ज्यांना चालवायचा असेल त्यांना चालवू द्या.’ यावेळी जयंत पाटील यांना प्रचंड रडू कोसळलं. पाहा जयंत पाटील यावेळी नेमकं काय म्हणाले:

‘आतापर्यंत आम्ही पवार साहेबांच्या नावाने मतं मागतो.. पक्षाला मतं पवार साहेबांमुळे मिळतात. आज पवार साहेबच बाजूला गेले तर आम्ही लोकांसमोर काय तोंड घेऊन जायचं? हा आमचा पहिला प्रश्न आहे. अजूनही पवार साहेब यांनी पक्षाचं प्रमुख नेते पद राहणं हे महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशातल्या राजकारणासाठी, देशातल्या लोकांसाठी आणि वेगवेगळ्या राज्यातील लोकांसाठी देखील गरजेचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब या नावानेच ओळखला जातो.’

‘असं अचानक पवार साहेबांनी बाजूला जाण्याचा पवार साहेबांनाही अधिकार नाही. त्यांना परस्पर असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा हा निर्णय आम्हा कोणालाही मान्य होणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की, त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.’ ‘त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजूनही इथून पुढे पाहिजे. आमच्या लहानपणापासून (जयंत पाटलांना रडू आवरेना) त्यांना बघून आम्ही राजकारण केलं. आजही त्यांच्याकडूनच आम्ही स्फूर्ती घेऊन राजकारण करतो.’ ‘त्यांनी अलिकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा काही दिवसांपूर्वी केली. पवार साहेब तुम्हाला आम्ही सगळे अधिकार देतो. पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे ती कोणालाही दुसऱ्याला येणार नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या.. तुम्हाला पक्ष कसा नव्या लोकांच्या हातात द्यायचाय तो द्या. (रडू आवरेना) पण पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजूला जाणं हे पक्षातल्या, देशाच्या, तरुणांच्या देखील हिताचं नाही. आम्हाला आपल्या छायेखाली काम करण्याची सवय लागली आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कोणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबू (रडू कोसळलं) हा पक्ष ज्यांना चालवायचा असेल त्यांना चालवू द्या.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

 

बातमी शेअर करा !
ajit pawarjayant patilNCPsharad pawar
Comments (0)
Add Comment