जळगावातील दोन अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव :-विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.शहजाद खान याची येरवडा तर मयूरची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल असण्यासह त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याच्यावरदेखील विविध पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल असून तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील दोघांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला.

तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आला व त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. आदेशानुसार शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात तर मयूर आलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांच्यासह रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, पोकॉ रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील यांनी कारवाई केली.

बातमी शेअर करा !
#jalgaonCrime
Comments (0)
Add Comment