जळगाव – जळगाव जिल्ह्यात आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः पक्षप्रवेश सोहळ्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मुंबई येथे पत्नी डॉ. वर्षा पाटील, कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी भाजपचा पंचा घालून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे कॉंग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी होते. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची तयारीही केली होती.
त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या कोणत्याही पक्षात नव्हत्या. त्याही लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले. डॉ. उल्हास पाटील आपल्या कन्येसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर कॉंंग्रेस पक्षाने डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना कॉंग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले.
काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्याने भाजपमध्ये प्रवेश
त्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकारपरिषद घेऊन कॉंग्रेसने केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच कॉंग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाण्याची आपली इच्छा नव्हती, परंतु आपल्याशी कोणतीही चर्चा न करता पक्षाने आपल्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आता आपल्याला पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आपण लवकरच दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेणार आहोत, अशी माहिती दिली होती. त्यानंतर डॉ. पाटील यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.