गुजरात | वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीत केबल पूल कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे.दरम्यान हा पूल तुटला त्यावेळी जवळपास 400 लोक पुलावर होते असे सांगण्यात आले आहे. तो तुटताच लोक नदीत पडले. या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत नदीतून 60 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यापैकी अधिक मुले, महिला आणि वृद्ध आहेत. उर्वरितांना वाचवण्यात आले असून एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती राजकोटचे भाजप खासदा मोहनभाई कल्याणजी कुंडारिया यांनी दिली आहे.
मोरबी येथे केबल पूल कोसळल्याच्या घटनास्थळी उपस्थित असलेले गुजरातचे पंचायत मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.
मोरबी येथील दुर्घटनेने आम्ही दु:खी आहोत. पीएम मोदींनी मला परिस्थितीबद्दल विचारण्यासाठी फोन केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री देखील आढावा घेत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले गुजरातचे मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की, स्थानिक नेते जखमींना मदत करण्याचे काम करत आहेत.
दरम्यान पीएम मोदींनीही या घटनेबाबत अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्यात आल्या. आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 70 जणांना रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यापैकी 7 जणांच्या मृत्यू झाल्याचे सांगितले होते. बचाव पथके सातत्याने लोकांना नदीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवत आहेत. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान हा पूल सुमारे 100 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत असून काही दिवसांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्तीच्या केवळ 5 दिवसानंतर हा पूल सामान्यांसाठी पुन्हा खुले करण्यात आला होता