भुसावळ : प्रतिनिधी
रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वे विभागाने ब्रिजवरून थेट प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे. ही लिफ्ट वयोवृद्ध, बालक व आजारी रुग्णांसाठी उभारली आहे. मात्र, या लिफ्टचा उपयोग खानपान विभागातील किंवा वेंडर सामान वाहून नेण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना लिफ्टच्या बाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
भुसावळला देशातील मोठे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकावर दिवस व रात्र मोठ्या संख्येने प्रवासी गाड्यांची ये-जा सुरू असते. हजारो प्रवासी या रेल्वेस्थानकांवर चढ-उतार करतात. यामुळे या ठिकाणी वयोवृद्ध प्रवासी, बालक, तसेच आजारी असे रुग्ण यांना त्रास होऊ नये यासाठी बाहेर जाण्याकरिता रेल्वे प्रशासनाने लिफ्ट इलेक्ट्रिक जिना, स्लोप रस्ता यांची सुविधा केली आहे. त्याचबरोबर बॅटरीवर चालणारी कार ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिन्यावरून प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्ट सुविधा आहे. मात्र, या लिफ्टचा उपयोग प्रवाशांना न होता स्थानकावर अन्नपदार्थ विकणाऱ्या कर्मचारी किंवा काम करणारे हेच करताना दिसतात. या लिफ्टने सामानाची प्लॅटफॉर्मवरून ब्रिजवर किंवा ब्रिजवरून प्लॅटफॉर्मवर ने-आण करण्यासाठी उपयोग करण्यात येत आहे.
सूचना फक्त नावालाच
रेल्वे प्रशासनाने लिफ्टच्या बाहेर स्पष्ट सूचना लिहिली आहे. ही लिए प्रवाशांसाठीच आहे. इतर कोणताही सामान या लिफ्टच्या माध्यमातून वाहतूक करू नये. केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना असल्यावरही सर्रासपणे अन्नपदार्थ वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होत आहे. रेल्वे प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही या ठिकाणी कुठलीच कारवाई होताना दिसत नाही