जळगाव | राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.25) देशभरातील नव मतदारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. नशिराबाद येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चातर्फे आयोजित कार्यक्रमातही असंख्य नव मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. हर्षल चौधरी, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, धर्मा करूले, तालुका सरचिटणीस गिरीश वराडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप नशिराबाद शहराध्यक्ष बापू बोढरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अॅड. हर्षल चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?
● 26 जानेवारीला देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना, नव मतदारांवर आगामी 25 वर्षात विकसित भारत घडविण्याची जबाबदारी आहे.
● भारताला स्वातंत्र्य बहाल करून देणाऱ्या तरूणांचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले गेले, आताच्या तरूणांसमोर भारताला जगात अव्वल बनविण्याची संधी चालून आली आहे.
● भ्रष्टाचार तसेच आर्थिक घोटाळे, बेरोजगारी, गरीबीमुळे कधीकाळी संकटात सापडलेल्या भारत देशाचे चित्र आज बदलले आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारत देश लवकरच सात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था पार करणार आहे.
● युवकांचे स्वप्न हेच माझे संकल्प आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, किंबहुना तीच सरकारची मोठी गॅरंटी आहे.
● आपले एक मत भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणार आहे तसेच देशाच्या विकासाला गती देणार आहे.
● 10 ते 12 वर्षांपूर्वी देशातील तरूणांचे भवितव्य अंधकारमय होते. देश आज प्रगतीच्या वाटेवर आहे. देशात पूर्ण बहुमताचे तसेच स्थिर सरकार आल्यास चांगले निर्णय घेणे सोपे जाईल.