जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सकाळी ९ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यंत रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाड रोड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, महापौर जयश्री महाजन, आमदार राजू भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रान, जंगल तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक असतात. मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्त्वे, खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण असतात. या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व पाककृती इ. बाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी. या उद्देशाने महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल. महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाचरी, घोळ, सांदळा कुई, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग इत्यादी रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. शेतकरी गटांमार्फत अस्सल रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावर ९ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हा महोत्सव सप्ताह स्वरूपात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह आपल्या जवळच्उ कृषी कार्यालयाशी संपर्क करावा. जास्तीत जास्त नागरिकांना या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंदासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व आत्मा प्रकल्प संचालक यांनी केले आहे.