जळगावात जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

जळगाव;- मराठी नाटकाची परंपरा व वारसा जपण्यासाठी दरवर्षी दि. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील रंगकर्मींनी बालगंधर्व खुले नाट्यगृहात एकत्रित होत श्री नटराज व रंगभूमी पूजन करत जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा केला.

रंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला जवळ जवळ १७० हुनही जास्त वर्षांची परंपरा आहे. १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ०५ नोव्हेंबर १८४३ साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे श्री नटराज व रंगभूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पूजन झाल्यानंतर नृत्यांगना हितेष्णा संजय पवार व संकेत दिपक वारुळकर यांनी आपला नृत्याविष्कार सादर करत नटराजाचरणी आपली नृत्यसेवा अर्पण केली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य समन्वयकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संदीप तायडे यांचा रंगकर्मींतर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शहरातील रंगकर्मी अरुण सानप, अविनाश चव्हाण, चिंतामण पाटील, पियुष रावळ, संजय निकुंभ, विनोद ढगे, योगेश शुक्ल, पद्मनाभ देशपांडे, सचिन चौघुले, हनुमान सुरवसे, आकाश बाविस्कर, शरद भालेराव, पवन खंबायत, तुषार वाघुळदे, संदीप तायडे, दिपक महाजन, संदीप वारुळकर, हितेष्णा पवार, सचिन महाजन, दुर्गेश अंबेकर, गौरव लवंगाळे, सुदर्शन पाटील, वहिगायन परिषद जळगावचे तालुकाध्यक्ष संतोष चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Marathi Natya Parishad and Balrangbhumi Parishad Celebrating World Marathi Theater Day
Comments (0)
Add Comment