मुंबई : नववर्षावर 1 जानेवारी पासून राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या तोंडावरच महाराष्ट्रातील रेशनदुकानदार संपावर जाणार आहेत.
राज्यात सुमारे 53 हजार रास्त भाव दुकानदार आहेत. परतू या सर्व दुकानदारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारची भूमिका उदासीन आहे अशी टीका महासंघाकडून करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशन काळात सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत फक्त आश्वासने देण्यात आली असून ठोस अशी भूमिका आणि निर्णय सरकारने घेतला नाही असा आरोप महासंघाने केला होता. त्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होणार आहेत.
काय आहेत रेशन दुकानदारांच्या मागण्या –
आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा
मार्जिन मनी ३०० रुपये करा
टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या
१ जानेवारी पासून होणाऱ्या रेशन बंद आंदोलनामध्ये सर्वानी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली दुकाने बंद ठेवावीत. या कालावधीत दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन बंद ठेवाव्यात, असे आवाहन पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केलं आहे.