जळगाव – आपल्या रोखठोक भूमिकांमधून चर्चेत असणाऱ्या रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद विद्या चव्हाण यांच्याकडे होते. मात्र आता इथून पुढे या पदाची जबाबदारी रोहिणी खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर बीडचे बबन गित्ते यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर बबन गित्ते यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत सक्रिय कामगिरी केली आहे. मध्यंतरी तरी त्या आंदोलनामुळे, तसेच आपल्या रोखठोक भाषणामुळे चर्चेत आल्या होत्या. रोहिणी खडसे यांनी मध्यंतरी गॅसच्या किमती वाढवल्यामुळे केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे रोहिणी खडसे यांना अटक करण्यात आली होती. अशा अनेक कारणांमुळे रोहिणी खडसे या चर्चेत राहिल्या आहेत. आता याच रोहिणी खडसे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, मध्यंतरीच बबन गीते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाला काही दिवस होतात राष्ट्रवादीने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. सध्या आगामी निवडणुकांसाठी शरद पवार गट जोरदार तयारी करताना दिसत आहे. शरद पवार यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये सभा देखील घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच या दोन मुख्य नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.