वॉशिंग्टन : युक्रेन-रशियाचं युद्ध सुरू होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. रशियाचा निषेध म्हणून अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रशियाचा आक्रमक पवित्रा कायम आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि युरोपियन देशांनी युक्रेनला लष्करी मदत करत रशियाला युद्धभूमीत धक्के दिले आहेत. यानंतर आता अमेरिकेनं रशियाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
रशियातून तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करणार नाही, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे. ‘तेल आणि नैसर्गिक वायूची आयात रोखल्याचे परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर होतील. रशियावरील निर्बंधांची किंमत अमेरिकेलादेखील मोजावी लागेल. त्याचा परिणाम अमेरिकेवरही होईल,’ असं बायडन म्हणाले.
अनेक कंपन्यांनी रशियातील आपलं कामकाज गुंडाळलं आहे. अनेक बड्या कंपन्यांनी रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे परिणाम रशियन अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. युक्रेनमधून विस्थापित झालेल्या नागरिकांची आम्ही मदत करू. त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ. त्यासाठी आम्ही युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या संपर्कात आहोत, असं बायडेन यांनी सांगितलं.