दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क: जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी (दि. २०) सेन्सेक्सने ५०० पेक्षा अधिक अंकांची उसळी घेत ७५,९५०च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवत २३,०००च्या वर स्थिरावला. तब्बल एका महिन्यानंतर निफ्टीने ही महत्त्वाची पातळी ओलांडली आहे. बाजारातील या वाढीमध्ये बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर राहिले.
आयटी शेअर्समध्ये चमक
सेन्सेक्सवरील इन्फोसिस, टीसीएस, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एम अँड एम, टायटन, टेक महिंद्रा आणि झोमॅटो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १ ते २.५ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, टाटा स्टील, एलअँडटी, बजाज फायनान्स आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स घसरणीस सामोरे गेले.
निफ्टी आयटी निर्देशांकात वाढ
निफ्टी आयटी निर्देशांकात १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्यांनी वधारले.
बाजारातील तेजीमागचे कारण
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बेंचमार्क व्याजदरात कोणताही बदल केला नाही आणि तो ४.२५-४.५ टक्क्यांच्या श्रेणीत कायम ठेवला. व्याजदर कपातीच्या शक्यतेला पूरक असे धोरण कायम असल्याने जागतिक बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला, ज्याचा प्रभाव भारतीय बाजारावरही झाला आहे.