न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

जळगाव : प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशन व कयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष असून तृतीय पुष्प गुंफण्यासाठी साम्ययोग साधनाचे संपादक मा. श्री. रमेश दाणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. “दादा धर्माधिकारींचे विचार आणि युवक” या विषयावर ते संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्मधिकारी भूषविणार आहेत.

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रथम अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी हे महिलांच्या हक्कांचे समर्थन करणारे, समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारे, गांधी विचारांवर आधारित समाज घडवण्याची जाण असलेले तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यासाठीच समर्पित केले होते. न्या. धर्माधिकारी यांनी सर्वोदय वारसा आत्मसात केला आणि आदर्श जीवनाचा मार्ग स्वीकारला होता. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरही त्यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षाची भूमिका सक्रियपणे स्वीकारली आणि फाऊंडेशनच्या उपक्रमांना सर्वोदय साकार करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केले. गांधींच्या विचारांवरील आधारित न्या. धर्माधिकारी यांचा चिरंतन वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ गांधी रिसर्च फाऊंडेशन व्याख्यानमाला आयोजित करत असते.

या स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. अभय बंग यांनी “दारूमुक्तीसाठी अहिंसक व विधायक चळवळ : गडचिरोली प्रयोग” या विषयावर गुंफले तर दुसरे पुष्प मेंढा लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा यांनी “सहमतीने गावाच्या स्वराज्याकडे” या विषयावर गुंफले.

२०२३ हे वर्ष महात्मा गांधींचे सहाध्यायी दादा धर्माधिकारी यांचे १२५ वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यासाठीच व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प दादा धर्माधिकारी यांना अर्पण केले जाणार आहे. गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात सकाळी १०.३० ते १२ या वेळात होणाऱ्या या व्याख्यानास ज्येष्ठ गांधीवादी डॉ.सुगन बरंठ, फाऊंडेशनचे अनिल जैन, विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस. टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक श्री.अजय शिंदे, डॉ.सचिन नांद्रे उपस्थित राहणार आहेत. सादर व्याख्यानास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कृपया गांधी रिसर्च फाउंडेशनशी ०९४०४९५५२७२, ०९४०४९५५२२० या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment