जळगाव ;- शहरातील गणेश कॉलॉनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून सेट्रींग काम करणारा मजूर खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी २वाजता घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. रहिम कासम पिंजारी (वय-५२) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव असे मयत मजूराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रहिम पिंजारी हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे वास्तव्याला होते. ठेकेदाराकडे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी गणेश कॉलॉनी परिसरात एका ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणी ते सेंट्रींग काम करत होते. दुपारी २ वाजून १० मिनीटांनी काम करत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणाऱ्या मजूरांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर व तौसीफ हे दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.