तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचे कारण काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल, राष्ट्रवादीचे ४ते ५ नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबीर !

मुंबई – शिंदे फडणवीस सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात, याचा अर्थ सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची सपशेल दिशाभूल करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मेरीटवर प्रकल्प येत असताना असे काय घडले की तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचे कारण काय हे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे असेही खासदार सुळे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या अभ्यास शिबिराचे दिनांक ४,५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

मुंबईतील बेस्टच्या बसेसवर मराठी दिवाळीच्या शुभेच्छा बॅनर पाहिले. शुभेच्छा दिल्याने बेस्टला पैसे मिळत असतील तर आनंद आहे. दिवाळीच्या शुभेच्छा द्या ना… मराठीवर प्रेम असेल तर कृती करुन दाखवा. मराठी भाषेसाठी काही तरी वेगळं करा. स्वतःच्या जाहिरातबाजीमध्ये मराठीपणा नको आम्ही मराठी लोकं फार स्वाभिमानी आहोत असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.

आनंद शिधा दिवाळीला लोकांना वेळेत भेटला का.. काही ठिकाणी फोटो व्यवस्थित झाले नव्हते म्हणून वाटप झाले नाही. आता यामध्ये फोटो महत्त्वाचा की गरीब माणूस महत्त्वाचा ज्याच्यासाठी तुम्ही हे करत आहात. हा पब्लिसिटी स्टंट होता. दिवाळीच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला द्या ना… मायबाप जनतेमुळे आपण आहोत. हे जाहिरातीचे सरकार आहे हे दुर्दैवी आहे असे स्पष्ट मतही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

पहिल्यांदा ईडी सरकारच्या विरोधात एक संवेदनशील नेता दिसला त्याचं नाव बच्चू कडू आहे. त्यांनी काल संवेदनशीलपणे ५० खोक्यांचा उल्लेख केला. बच्चू कडू यांनी आरोग्यासाठी, अपंगांसाठी चांगले काम केले आहे. ५० खोक्यांचे ऐकून त्रास होतोय हे सांगितले त्याचा आनंद झाला असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वर्तमानस्थितीबाबत आकलन वाढवणे व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासंदर्भात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हे शिबीर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून होणार आहे.

पक्षाची २३ वर्षाची वाटचाल व योगदान, पक्षाने राज्यात केलेले काम, देशाची व जगाची परिस्थिती यावर दोन दिवस चर्चा होणार आहे. पक्षाच्यावतीने एक अ‍ॅप काढले आहे. या अ‍ॅपमध्ये पक्षाची सर्व माहिती, निर्णय पुढच्या पिढीला अवगत होणार आहे. या शिबीराला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून मोकळी चर्चा केली जाणार आहे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment