जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीत या मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कुणाकडे जाणार ? याकडेच आता लक्ष लागून आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचे ईश्वरलाल जैन यांनी पंजा चिन्हावर निवडणूक लढवून भरघोस मतांनी विजय मिळविला होता. आपल्या राजकारणाची सुरूवात याच मतदारसंघातून त्यांनी केली होती. सुरेश जैन यांनीही या मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले होते. त्यांनी प्रथम निवडणूक पंचा चिन्हावर लढवूनच विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर त्यांनी कॉग्रेस एस, राष्ट्रावादी कॉंग्रेस व शिवसेनेतर्फे निवडणूक लढवून विजय मिळविला होता. सुरेश जैन यांनी जळगाव विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्वनिर्माण केल्यानंतर काँग्रेसला कधीही या मतदारसंघात यश मिळालेले नाही.
तिन्ही पक्षांचा दावा
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढविला होता. त्या अगोदर हीच जागा शिवसेनेकडे होती. तर पारंपरिक ही जागा कॉंग्रेसची आहे. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. विशेष म्हणजे तिन्ही पक्षाने उमेदवारीची तयारी केली आहे. तिन्ही पक्षाने उमेदवारांचे अर्ज भरून घेतले आहेत. त्याच दाव्यावर श्रेष्ठींकडे तिन्ही पक्षातील अध्यक्ष दावा करीत आहेत.
राष्ट्रवादी व ठाकरे गटात वादाची ठिणगी
जिल्ह्यातील ११ मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांच्यात काही मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष आपआपल्या मतदारसंघावर दावा सोडण्यास तयार नाहीत. शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात जळगाव ग्रामीण, एरंडोल, जळगाव शहर मतदारसंघावरून वाद सुरू आहेत. ठाकरे गटाला हे तिन्ही मतदारसंघ पाहिजेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही हे तिन्ही मतदारसंघ हवे आहेत. एरंडोल आणि जळगाव ग्रामीण कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गटाला लढवायचे आहेत. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आम्हाला मतदारसंघ हवे आहेत, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
सन २०१४ पासून भाजपचा बालेकिल्ला
भारतीय जनता पक्षाने सन २०१४ पासून या मतदारसंघावर आपला शिक्का मोर्तब केले आहे. सन २०१४ मध्ये राज्यात युती व आघाडी मोडून सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपतर्फे आमदार सुरेश भोळे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे सुरेश जैन यांना पराभूत केले होते. त्यानंतर पुढे २०१९ मध्येही भाजपचे भोळे विजयी झाले. सद्या या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व आहे.
भाजपपुढे आव्हान कोण देणार?
जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत वजयी झालेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी महाविकास आघाडी सज्ज आहे. परंतु महाविकास आघाडीत कोणाकडे ही जागा जाणार, याबाबत अद्याप निश्चित झालेले नाही.
उमेदवार तयार पण चिन्ह मात्र गुपीत
महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे निश्चित नसल्यामुळे उमेदवार आपले चिन्ह जाहीर करीत नसल्याचे दिसत आहे. मतदारसंघातून उमेदवार आपला प्रचार करून भाजप विरोधी असल्याचे सांगत आहेत. परंतु आपले चिन्ह जाहीर मात्र करीत नाही. त्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार यावरच पुढचे अवंलबून असणार आहे. ज्या पक्षाला जागा सुटेल त्या पक्षात प्रवेश करून त्याचे चिन्ह घेवून महाविकास आघाडीचा उमेदवार होण्याकडे उमेदवारांचा कल आहे. त्यामुळे आता जळगाव विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाकडे जातो? याकडेच सर्वाचे लक्ष असून लवकरच ते स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.