मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नाकारल्याचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळेच आता होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देणार असल्याचे वृत्त हाती आलेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आपल्या कोट्यातली दहा टक्के जागा मुस्लिम उमदेवारांना देणार आहेत.
अजित पवारांची सावध भूमिका
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याचे समोर आलेय. जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे.
मुंबईत अजित पवारांना किती जागा मिळणार ?
जागावाटपासाठी महायुतीच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. सध्या ८० टक्के पेच सुटला आहे. पण उर्वरित जागांचा तिढा कायम आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी अजित पवार यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार या चारही जागांवर मुस्लिम उमेदवार देणार आहे. मुंबईत चार आणि एमएमआर रिजनमध्ये १ अशा ५ जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम उमेदवार देणार असल्याचे समोर आलेय. महायुतीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीला ४ जागा सुटणार आणि चारही जागांवर मुस्लीम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय प्रत्येक प्रादेशिक विभागात एक मुस्लिम उमेदवार देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कऱण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेय.
मुंबईमध्ये अजित पवार कुणाला उमेदवारी देणार? संभाव्य उमेदवार
- नवाब मलिक
- सना मलिक
- जिशान सिद्दीकी
- नजीम मुल्ला
राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण राजकीय नेत्यांनी अंदाज वर्तवलाय. त्यानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते २० नोव्हेंबर यादरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्याशिवाय यावेळी राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेय.