जळगाव: शाहू नगर येथे एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५.३४ लाख रुपये) जप्त केला आहे. याप्रकरणी सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीनंतर पोलिसांची धडक कारवाई
गस्त घालत असताना पोलिसांना शाहू नगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता पोलिसांनी छापा टाकून सर्फराजच्या घरातून दोन पुड्यांसह मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले.
संशयित आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास
तपासादरम्यान, सर्फराज भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. पोलिस सध्या त्याने हे ड्रग्ज कुठून आणले, त्याचा पुरवठादार कोण आहे, तसेच कोणाला विक्री करत होता, याचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी सांगितले की, तपासात आणखी महत्त्वाचे धागे उलगडण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा साठा जप्त
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सुनील पाटील, रणजीत पाटील व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांनी अशा बेकायदेशीर व्यवहारांविषयी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.