महाशक्तीच्या साक्षीने रक्तदान करून अनिल चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज!
रावेर-यावल मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार
रावेर : रावेर-यावल मतदार संघाचा विकास गेल्या ४० वर्षापासून रखडला असून पिढीजात वारसा आणि खोट्या आश्वासांना मतदार आता कंटाळले आहेत. मतदारांना परिवर्तनाची आस असून यंदा परिवर्तन घडणारच आहे. सर्व समाजातील महाशक्तीच माझी खरी ताकद असून रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत मी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.
प्रहार जनशक्ती पक्ष, परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन न करता सामाजिक संदेश देत रक्तदान करून शेतकरी, दिव्यांग, कामगार, महिला, तरुण यांनासोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज रावेर तहसीलदार यांच्याकडे दाखल केला.
रावेर-यावल विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले अनिल छबिलदास चौधरी यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान संदेश देत सोमवारी शहरातील यशवंत विद्यालयासमोर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात रक्तदान करून त्यांनी इतरांना देखील रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. मोठी मिरवणूक न काढता आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
रक्तदान शिबिर आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना गणेश बोरसे, इरफान शेख, अभिमन्यू चौधरी, दिलीप वाणी, तुकाराम बारी, शुभम पाटील, करीम मण्यार, दिलीप बंजारा, नंदकिशोर सोनवणे, पिंटू धांडे, योगेश निकम, भरत लिधुरे, राकेश भंगाळे, वसीम शेख, सचिन महाजन, सचिन झाल्टे, विकास पाटील, फिरोज शेख, हकीम खाटीक यांची उपस्थिती होती.