DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ

पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | प्रतिनिधी
नवीन मराठी वर्षाची सुरुवात चैत्र पालवी स्वर उत्सवाने करण्यात आली. दीपक चांदोरकर यांची संकल्पना असलेल्या ओवी ते पसायदान मराठी गीतांचा अविष्कार रसिक श्रोत्यांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाला. प्रीती झारे यांचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन यामुळे जळगावकर रसिकांचा या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

मराठी नववर्षाच्या निमित्ताने शहरातील गांधी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या…’ ऐश्वर्या परदेसी यांच्या गाण्याने झाली. यानंतर भूपाळी या प्रकाराच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले, यात ‘प्रभाती सुर नभी रंगले …’ ‘मलयागिरीचा चंदन गंधित धूप तुला दावीला उठी उठी गोपाळा…’ हे ‘देव दिनाघरी धावला’ या नाटकाचे पद सादर करण्यात आले. त्यानंतर श्रीरामाचे गीत ‘उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली’ या पदाने रसिकांकडून दाद मिळाली. भूपाळी मेलडी प्रकारात
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला…’ ही सुप्रसिद्ध रचना किरण सोहळे यांनी विशिष्ट शैलीमध्ये गायली. ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे..’, पांडुरंग नामे लागलासी ध्यास ही रचना श्रुती जोशी यांनी सादर केली. यावर्षी मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्याच्या औचित्याने गाण्याच्या माध्यमातून भाषेचा गौरव सांगणारे गाणे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ हे गीत रचना सादर करण्यात आली. . ऐश्वर्या व श्रुती यांनी ‘धन राणी धन राणी साजना…’ हे गाणे सादर केले. यानंतर भवानी देवीचा गोंधळ सादर करण्यात आला. ऐश्वर्याने कविवर्य स्वर्गीय ना. धो. महानोर यांची रचलेली लावणी ‘राजसा जवळ जरा बसा..’ सादर केली. कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर अपर्णा भट कासार यांच्या प्रभाकर संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी नृत्य अविष्कार सादर करून केला. ‘उत्तुंग भरारी घेऊया… मी मराठी मी मराठी…’ तसेच बहिणाबाई चौधरी यांची रचना ‘माझी माय सरस्वती माले शिकवते बोली…’ या गाण्यांवर नृत्य अविष्कार सादर झाला आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. आपल्या नृत्याच्या अविष्काराबद्दल नृत्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
नववर्षाची इतकी चांगली सुरुवात करून दिलेल्या या कार्यक्रमाच्या कलाकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात गायिका श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेसी आणि किरण सोहळे यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी वादक म्हणून लाभलेले राजेंद्र माने (हार्मोनियम), राहुल कासार (तबला), दर्शन गुजराती (पखवाज) यांचा सत्कार करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती झारे यांनी केले आभार प्रदर्शन नुपूर खटावकर चांदोरकर यांनी केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.