बालदिनानिमित्त रेडक्रॉस मार्फत शैक्षणिक, हायजेनिक साहित्य व पौष्टीक आहार वाटप
जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव यांच्यामार्फत बाल दिनानिमित्त रिमांड होम मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, हायजेनिक साहित्य व पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन श्री. सुभाष सांखला, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, रतनलाल बाफना फाउंडेशन ट्रस्टच्या सौ. बाफना, महिला बालकल्याण समिती सदस्या सौ. वैशाली विसपुते, श्री. संदीप पाटील, रिमांड होमच्या अधीक्षिका सौ. जयश्री पाटील, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रिमांड होमच्या अधीक्षिका जयश्री पाटील यांनी रेडक्रॉस मार्फत वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्य व मदतीबद्दल सर्वांचे कौतुक केले व पुढे हि असेच सहकार्य मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली. रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी बाल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत रेडक्रॉसमार्फत देण्यात येत असलेल्या हायजेनिक कीटबद्दल सविस्तर माहिती दिली.
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपलं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आपण केलेल्या चुकांमुळे माणसाला आयुष्यात खूप दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. यासाठी मनात राग न ठेवता प्रत्येकाबद्दल आपुलकी आणि प्रेम ठेवावे. नेहमी प्रत्येकाला मदत करण्याची भावना ठेवावी. यामुळे आपण समाजात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करू शकू. यासाठी सदैव प्रयत्नशील रहा आणि आम्ही सदैव आपल्या सोबत आहोतच.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सर्व मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.