अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकरी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असून, यामुळे खरीपच्या पीकांचे नुकसान होत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन, नांगरणी, फवारणी ही कामे देखील करता येत नाहीत. शेतांमध्ये गवत वाढले आहे. तर सखल जमिनीचा भाग असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. पीकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सरासरी उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे, हा धोका लक्षात घेता व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तत्काळ नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन, पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्याच्याही सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. तर जळगाव, धरणगाव , बोदवड, भुसावळ, चोपडा, मुक्ताईनगर व यावल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.