मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे बुजविले स्वातंत्र्य चौकातील खड्डे
नवीन बसस्थानकासमोर काँक्रिट रस्त्याला तयार केले रॅम्प
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १३ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यांच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांची मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपुर्वी पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्यामुळे शनिवारी स्वातंत्र्य चौकातील खड्डे बुजविण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आकाशवाणी चौक ते मनपापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून या रस्त्याच्या आजूबाजूची साफसफाई करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पथदिवे दुरुस्त करणे अशा विविध सूचना मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर शनिवारी मनपाच्या बांधकाम विभागाने स्वातंत्र्य चौकातील खड्डे बुजविले. तसेच मनपाच्या बांधकाम विभागाने पीडब्ल्यूडी विभागाला पत्र देवून ज्या ज्या ठिकाणी काँक्रिट रस्त्यामध्ये गॅप सोडण्यात आले आहेत. त्या-त्या ठिकाणी उतार (रॅम्प) बनविण्यात यावे, असे सूचित केले होते. त्यानुसार पीडब्ल्यूडी विभागाने मक्तेदाराला निर्देश दिले असून मक्तेदाराने शनिवारी नवीन बसस्थानकासमोर रॅम्प तयार केले असून उर्वरीत ठिकाणी देखील रॅम्प तयार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.