केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज
जैन हिल्सवरील ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ चर्चासत्रात शास्त्रज्ञांचे विचारमंथन
जळगाव | प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाचा प्रादुर्भाव व धोका वाढताना दिसत आहे. केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाने फिलपीन्स, इंडोनिशीया, चिन, ऑस्ट्रेलिया, होंडूरस, कोलंबिया, तैवान, इस्त्राईल, नेपाळ, पाकिस्तान यासह अनेक देशातील केळी बागा उध्वस्त केल्या आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घटत आहे. म्हणून या रोगाला कसे ओळखाचे, आपल्या परिसरात रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करायचे व रोग व्यवस्थापन कसे करावे, जेणे करुन भविष्यात केळी पीक शाश्वत राहिल; यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली, ICAR-राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र ,(NRCB) त्रिची यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्या सहकार्याने ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचार मंथन केले.
जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून केंद्र सरकारचे माजी उद्यान आयुक्त व कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोग) डॉ. आर. थंगवेलु, माजी संचालक डॉ. बी. पद्मनाथन, बिहारच्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठमधील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंग, जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षीक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. बिरपाल सिंग, प्रयोगशील शेतकरी धिरेंद्रभाई देसाई, प्रेमानंद महाजन उपस्थित होते. तर पॅनल चर्चेत मान्यवरांसह डॉ. ललित महात्मा, डॉ. बी. के. यादव, किशोर चौधरी, प्रफुल्ल महाजन, विशाल अग्रवाल, गोपाल पाटील खामनी, विनायक पाटील, किशोर महाजन, संतोष लचेटा, हरदिपसिंग सोलंकी, निखील ढाके, कमलाकर पाटील, पवन पाटील, रितेश परदेशी, गम्पाशेठ चौधरी, रविंद्र पाटील, विशाल पाटील, सुनील पाटील, सुधाकर पाटील, अमित पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरवात झाली. शाल, सूतीहार, गांधीजींची प्रतिमा देऊन मान्यवरांचे स्वागत झाले. प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. जळगाव, धुळे, बुऱ्हाणपूर, बडवाणी, नर्मदानगर या जिल्हांसह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सहभागाबाबत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
उद्घाटन सत्रात डॉ. आर. थंगवेलू म्हणाले, क्लायमेंट चेंजमुळे फ्युजारीयम विल्ट, टीआर-४ वाढतांना दिसत आहे. आवश्यक काळजी घेतली गेली नाही तर त्याचे पुढील काही वर्षात विपरीत परिणाम दिसतील. यासाठी सामूहिक पद्धतीने नियोजन करुन फ्युजारीयम विल्ट वर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी माती परिक्षण, रोपांची गुणवत्ता, रोगमुक्त रोपं व कंद लागवड, पीक पद्धतीत बदल, शेतातून बाहेर जाताना किंवा शेतात येताना पायातील बुट सॅनिटायईजेशन केले पाहिजे, असे उपाय योजनांसह त्यांनी सादरीकरण केले. फ्युजारीयमचे लक्षणं, त्याचा प्रवास कसा होतो हेही त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या सांगितले.
कुरबान तडवी म्हणाले, संपूर्ण देशाच्या तुलनेने महाराष्ट्रात विल्ट या रोगाचा शिरकाव कमी किंबहूना नसल्यागत आहे मात्र आपण धोकादायक स्थिती आहोत कारण सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यातून होते. त्यासाठी काळजीसुद्धा सर्वात जास्त आपण घेतली पाहिजे.
डॉ. एच. पी. सिंग म्हणाले, केळी पीक हे आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जीवनदायी पीक आहे. त्यामुळे त्याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. इतिहासाकडे डोकावलो तर केळीत बदल होताना दिसतात. नवनवीन तंत्रज्ञानाने आपण शेती करत असलो तरी नवीन समस्याही निर्माण होत आहेत ही वस्तूस्थिती आहे. मात्र त्यावर वेळीच अटकाव केला तर भविष्य सुकर होते. फ्युजारीयम वर कायम स्वरुपी सोल्युशन अजूनही नाही त्यामुळे केळी पिकावर एक प्रकारे कोराना व्हायरस सारखा तो काम करत आहे. सक्तीने नाही तर सामूहिक शक्तीने प्रतिबंधात्मक उपाय करुन नियंत्रण ठेवता येईल. यासाठी संशोधक, वैज्ञानिक, शेतकरी आणि जैन इरिगेशन सारख्या संस्थांनी सामाजिक स्तरावर चळवळ प्रमाणे काम केले पाहिजे. उन्हाळ्यात जमीन नांगरुन पडू देण्यासह जनजागृतीवर भर दिला पाहिजे. विषाणू आहे तेथेच त्याला संपवले पाहिजे त्याचे पुढे संक्रमण होऊ देऊ नये असेही त्यांनी सुचविले.
डॉ. एस. के. सिंग यांनी तांत्रिक सत्रात सांगितले की, फ्युजारीयमुळे जगातील एकूण उत्पादनापैकी सध्या १५ टक्के केळी प्रभावीत झाली आहे. २०४० पर्यंत ती ४० टक्क्यांपर्यंत होईल. १० मिलीयन डॉलरमध्ये त्याचे नुकसानाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इस्त्राईल, ओमान, पाकिस्तान, टर्की यासह १३ देशांमध्ये विल्टचे प्रमाण वाढले आहे. जगातील १३६ देशात केळीची शेती होते. त्यातील २४ देशांना थोड्याफार प्रमाणात का होईना या विषाणूंमुळे प्रभावीत केले आहे. भारतात महाराष्ट्र सोडले तर जवळपास कमी जास्त प्रमाणात फ्युजारीयम विल्ट अॅक्टीव्ह आहे तो एका शेतात जवळपास ५० वर्षांपर्यंत राहू शकतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन सुरु असून लवकरच फ्युजीकॉन्ट व नो टू विल्ट टेक्नोलॉजी आयसीआर तयार करेल असाही विश्वास त्यांनी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.
डॉ. पद्मानाथन यांनी सादरीकरणातून केळीच्या मुळांच्या आरोग्याबाबत सांगितले. फ्युजारीयम टाळण्यासाठी कोणकोणती पीकांनंतर केळीची लागवड केली पाहिजे हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
डॉ. के. बी. पाटील यांनी फ्युजारीयम व्यवस्थापनावर चर्चेत सहभाग घेतला. रोगग्रस्त झाडाला तण नाशकाचे इंजेक्शन देऊन तेथेच मारावे व त्यावर भूसा टाकून झाड बागेत जागेवरच जाळावे. रोगग्रस्त झाड दिसताच क्षणी त्याला कंटेन्टमेंट करण्यासाठी बाजूच्या आठ झाडांना दोरी बांधावी जेणे करून रोगग्रस्त झाडा जवळ मजूर किंवा कुणीही जाऊ शकणार नाही. फार्म फूट बाथ करणे, अवजारे, मजूरांची बूट व चपला, दळणवळणाची साधने सॅनेटाईज केले पाहिजे, जैविक नियंत्रण करणे, गादीवाफा पद्धत वापरली पाहिजे, ड्रिप वापरावे, केक, निम केकसह संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करुन बाग सशक्त ठेवणे, प्रत्येक गावाच्या वेशीवर फूट बाथ व टायर बाथ म्हणजे निर्जतूकीकरण करण्याची सुविधा निर्माण करणे गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात रोगाचा शिरकाव होणार नाही. यासाठी सामूहिक खबरदारीचे उपाय करणे. फिलिपिन्स मधील शास्त्रज्ञांचा दाखला देत फ्युजारीयम एक वर्षात १०० कि.मी. चा प्रवास करतो त्यामुळे त्याची भयानकता लक्षात येत असून केळीची शेती शाश्वत ठेवायची असेल तर आताच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. सकारात्मक मानसिकतेतून आपले शेत, गाव, शहर, जिल्हा आणि नंतर व्यापकस्तरावर बागा सुरक्षितेच्या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत. चर्चासत्र यशस्वितेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहुल भारंबे, तुषार पाटील, मोहन चौधरी, योगेश पटेल, सतिष राजपूत, शुभम पाटील, जयदीप अझहर, संजय पाटीदार यांच्यासह अॅग्रोनॉमिस्ट यांनी सहकार्य केले.